वाढीव जीएसटी अनुदान व वेतनासाठी परभणी मनपा कर्मचाऱ्यांचे मुंबईत धरणे
परभणी, 18 ऑगस्ट (हिं.स.)। वाढीव जीएसटी अनुदान तसेच प्रलंबित वेतन व वेतनातील फरकाची रक्कम तातडीने मिळावी, या प्रमुख मागणीसाठी परभणी शहर महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशीह
वाढीव जीएसटी अनुदान व वेतनासाठी परभणी मनपा कर्मचाऱ्यांचे मुंबईत धरणे


परभणी, 18 ऑगस्ट (हिं.स.)। वाढीव जीएसटी अनुदान तसेच प्रलंबित वेतन व वेतनातील फरकाची रक्कम तातडीने मिळावी, या प्रमुख मागणीसाठी परभणी शहर महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशीही मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष नासेर खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, बाशिद खान, मनोज तळेकर, नजम खान, इस्माईल बाबा, प्रकाश गायकवाड, भागवत कडनूर, केशव पैके, मोहन वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांनी आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आयुक्तांनी घेतली आंदोलनस्थळी भेट परभणीतील महापालिका कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी भेट देऊन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिकेला निधी उपलब्ध झाल्यास प्रलंबित पगार तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासमवेत उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम आणि सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी उपस्थित होते. संघटनेचे के. के. भारसाखळे, अनुसयाबाई जोगदंड, विशाल उपाडे, लक्ष्मण जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. मनपा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक व संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लतच्या वतीने शेख सलीम शेख इब्राहिम यांनी आंदोलनात सहभाग घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. के. आंधळे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत भूमिका मांडली. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार यांनी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाले असून, शासनाने वाढीव जीएसटी अनुदान आणि प्रलंबित वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी जोर धरत आहे. परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन मुंबई तसेच परभणीत सुरू असल्याने शासनाकडून आता कोणता निर्णय घेतला जातो, याकडे कर्मचारी आणि परभणीकरांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande