शासकीय आर्थिक व्यवहारांत अचूकता आणि पारदर्शकता आवश्यक : सुहासिनी गोतमारे
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : शासकीय आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि विहित नियमांचे काटेकोर पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक व्यवहार अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे गरजेचे आहे, असे प
शासकीय आर्थिक व्यवहारांत अचूकता आणि पारदर्शकता आवश्यक : सुहासिनी गोतमारे


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : शासकीय आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि विहित नियमांचे काटेकोर पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक व्यवहार अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रधान महालेखापाल सुहासिनी गोतमारे यांनी केले.

महालेखापाल कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सहसंचालक, लेखा व कोषागारे कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी संयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

यावेळी वरिष्ठ उपमहालेखापाल जितेंद्र बी. गुप्ता, सहसंचालक रेहाना काझी, वरिष्ठ कोषागार अधिकारी वैजनाथ शेळके, वरिष्ठ लेखा अधिकारी डी. एन. कोतुरवार, जिल्हा कोषागार अधिकारी, अपर कोषागार अधिकारी, विविध विभागांचे आहरण व संवितरण अधिकारी तसेच लेखा व कोषागार विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गोतमारे म्हणाल्या की, शासकीय आर्थिक व्यवहारांचे लेखांकन करताना योग्य लेखाशीर्षाचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे चुकीच्या नोंदी आणि लेखावर्गीकरण टाळण्यास मदत होते. तसेच प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे विहित वेळेत सादर करणे आणि लेखाविषयक त्रुटींचे तातडीने निराकरण करण्याकडे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत उपयोगिता प्रमाणपत्रे, जीएसटीसंदर्भातील बाबी, लेखांकन प्रक्रिया, चुकीचे लेखावर्गीकरण आणि प्रलंबित देयके यांसह विविध आर्थिक व लेखाविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

वरिष्ठ उपमहालेखापाल जितेंद्र बी. गुप्ता यांनी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या स्तरावर करावयाच्या लेखाविषयक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. सहसंचालक रेहाना काझी यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. उपकोषागार अधिकारी सय्यद इरफान यांनी सूत्रसंचालन केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande