
सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सोलापूरच्या विमानसेवेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करणे, अतिक्रमणे हटविणे आणि आवश्यकतेनुसार भूसंपादन करणे, तसेच बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी वन विभागाच्या जमिनीचे भूसंपादन आणि प्रस्तावित आराखड्याबाबत बैठकीत चर्चा झाली. होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगसाठी अतिक्रमणे हटविणे आणि भूसंपादनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी यापूर्वी दिली होती. दुसरीकडे, बोरामणी विमानतळाचा विषय सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांत मार्गी लागू शकतो, अशी माहितीही देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांच्या दिल्ली भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
होटगी रोड विमानतळावरून सुरू असलेली सोलापूर–मुंबई विमानसेवा अधिक नियमित करण्यासोबतच सोलापूर–हैदराबाद आणि सोलापूर–तिरुपती विमानसेवा सुरू करण्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरच्या विमानसेवेला अधिक बळकटी देऊन प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यातून जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, या दृष्टीने या भेटीत सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे पालकमंत्री गोरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड