
सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती व मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे भुसे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेण्यात आली.
पूरपरिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती तसेच शाळांमधील मूलभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बाधित शाळांची तातडीने दुरुस्ती, आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणे गरजेचे असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. पूरग्रस्त शाळांच्या दुरुस्ती व विकासासाठी आवश्यक निधी तसेच प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
यावेळी सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत हस्तांतरित करण्याबाबतही चर्चा झाली. हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.पूरग्रस्त तसेच हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा विचार करून शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड