दुचाकी चोरी करून विक्रीचा डाव फसला; चोरलेल्या दुचाकींसह आरोपी जेरबंद
दोन महिन्यांपूर्वी चोरलेल्या दुचाकी विक्रीच्या तयारीत; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरी केलेल्या दोन दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत
पोलीस कारवाई


दोन महिन्यांपूर्वी चोरलेल्या दुचाकी विक्रीच्या तयारीत; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

लातूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरी केलेल्या दोन दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

लातूर शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान १८ ऑगस्ट रोजी शहरातील एका बस डेपो परिसरात दोन मोटारसायकलींसह एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. यावेळी दोन मोटारसायकलींसह संशयास्पदरीत्या थांबलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याने आपले नाव खंडू ऊर्फ अजय बालाजी पवार (वय ३०, रा. टाकळी, ता. जि. लातूर, हनुमान मंदिरासमोर) असे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडील दोन्ही मोटारसायकलींबाबत कसून चौकशी केली असता, त्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी लातूर शहरातील इंदिरानगर परिसरातून होंडा युनिकॉर्न, तसेच मंत्रीनगर परिसरातून हिरो पॅशन प्लस मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या या दोन्ही दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ ठेवल्याचेही चौकशीत समोर आले.

आरोपीकडून एकूण ३५ हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तपासातून चोरीच्या आणखी घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.आरोपी खंडू ऊर्फ अजय पवार याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४३/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बाबकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस अंमलदार माधव बिलापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराबखान पठाण, गणेश साठे, शैलेश सुडे आणि श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande