
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : जलसंधारण सप्ताहानिमित्त मृद व जलसंधारण विभागाचे छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांची विशेष मुलाखत बुधवार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत मृद व जलसंधारणाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गिते यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी गिते यांच्याशी संवाद साधला आहे. ही मुलाखत बुधवार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8.40 वाजता आकाशवाणीच्या एफएम 101.7 मेगाहर्ट्झ या वाहिनीवर ऐकता येणार आहे. तसेच न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून देशाच्या कोणत्याही भागातून ही मुलाखत ऐकता येणार आहे.
मुलाखतीत जलसंधारण सप्ताहाचा उद्देश, त्यानिमित्त राबविण्यात येणारे जनजागृती उपक्रम, महावॉकेथॉन, ‘रिल बनवा’ स्पर्धा तसेच अन्य उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जलसंधारणातील विविध उपचार, मृद व जलसंधारणाचे पर्यावरणीय महत्त्व, जलचक्राचे महत्त्व तसेच मृद व जलसंधारणाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवरही अभ्यासपूर्ण माहिती गिते यांनी दिली आहे.
श्रोत्यांनी ही विशेष मुलाखत आवर्जून ऐकावी, असे आवाहन कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis