रत्नागिरी : पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे माचाळमध्ये पर्यटन नियमावलीचा उभारला फलक
रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । माचाळ (ता. लांजा) येथे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन माचाळ परिवर्तन सेवा संस्थेने गावात पर्यटन नियमावलीचा फलक उभारला आहे. माचाळ हे केवळ पर्यटनस्थळ नसून समृद्ध निसर्ग, स्थानिक संस्कृती, धार्मिक श्रद्धा, परंपरा आ
माचाळ गावात उभारलेला सूचनांचा फलक


रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । माचाळ (ता. लांजा) येथे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन माचाळ परिवर्तन सेवा संस्थेने गावात पर्यटन नियमावलीचा फलक उभारला आहे.

माचाळ हे केवळ पर्यटनस्थळ नसून समृद्ध निसर्ग, स्थानिक संस्कृती, धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि ग्रामजीवनाची वेगळी ओळख जपणारे गाव आहे. पर्यटन वाढत असताना या सर्वांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यटकांनी गावातील नियमांचे पालन करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, पर्यावरणाचे संवर्धन करावे, तसेच धार्मिक स्थळे, स्थानिकांच्या भावना आणि ग्रामसंस्कृतीचा आदर करावा, या व्यापक उद्देशाने पर्यटन नियमावलीचा फलक उभारण्यात आला आहे. सन २०१८ पासून सामाजिक, ग्रामविकास आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या माचाळ परिवर्तन सेवा संस्थेने भविष्यातील वाढते पर्यटन लक्षात घेऊन माचाळमध्ये जबाबदार पर्यटनाची दिशा निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नियमावलीच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, धार्मिक स्थळांचा सन्मान, गावातील शांतता व शिस्त तसेच ग्रामसंस्कृतीचे जतन याबाबत पर्यटकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

पर्यटकांचे मनापासून स्वागत आहे; मात्र माचाळचा निसर्ग, संस्कृती आणि ग्रामसंस्कार जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. या उपक्रमावेळी अॅड. अजय विठ्ठल पाटील, दीपक गंगाराम पाटील, महादेव शंकर भोसले आदी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

माचाळमध्ये पर्यटन वाढावे, स्थानिकांना रोजगार व आर्थिक संधी मिळाव्यात आणि गावाच्या विकासाला चालना मिळावी, ही संस्थेची भूमिका आहे. मात्र पर्यटनाच्या वाढीसोबत माचाळची माती, माणसं, संस्कृती, परंपरा आणि निसर्ग यांची ओळख कोणत्याही परिस्थितीत हरवू नये, यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande