
अकोला, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
अकोल्यात सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारींची संख्या 10 हजार 35 झाली असून, याचे क्षेत्र 14 हजार हेक्टर पर्यंत आहे. यासंदर्भात 12 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंचनामे मात्र 7 हजार तक्रारींचेच झाले आहे. वेळ निघून गेल्याने दुबार पेरणी न झाल्याने हिरवीगार दिसणारे अनेक शेत आता कोरडी पडलेली दिसत आहेत.
राज्यासह अकोल्यातही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. यासंदर्भात कृषी विभागात 10 हजार 35 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्याचे क्षेत्रफळ 14 हजार 402 आहे, 36 हजार एकर आहे. मात्र 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही 7 हजार तक्रारींचे पंचनामे झाले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईवर कधी मिळणार यासंदर्भात शेतकऱ्यांना शंका आहे.
सोयाबीन न उगवल्याने अकोल्याच्या मूर्तिजापूर मतदार संघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दाही मांडला होता. मात्र काही शेतकऱ्यांनी परस्पर कंपन्यांसोबत सेटलमेंट केल्याचं पिंपळे सांगितलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी सेटलमेंट केली नाही, त्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, जर कंपन्यांनी कंपन्यांनी शेतकऱयांना नुकसान भरपाई नाही दिली तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दोषी कंपन्या ब्लॅक लिस्ट करण्यासाठी पाऊल उचलेल असा इशाराही पिंपळे यांनी दिला आहे. बियाण्यांचे नमुने वेळेवर तपासल्या गेले नाहीत, ही चूक कृषी विभागाचीच असल्याचं मत पिंपळे यांनी मांडल. राज्यभरात बियाणे तपासणीच्या केवळ चारच प्रयोगशाळा आहेत, त्यामुळे बियाण्यांचे नमुने वेळेवर तपासले जात नाहीत. म्हणून आणखी नव्या प्रयोग शाळा उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव मांडला आहे. भविष्यात प्रयोगशाळा झाल्यास बोगस बोयाण्यांवर आळा बसू शकेल.
गेल्यावर्षी कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले. रब्बी हंगामातही नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उशिरा केली; परंतु पेरणीनंतर बियाणे उगवलेच नाही, म्हणून दुबार पेरणी करावी लागली. मात्र अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी शेत तयार केली, मात्र दुबार पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता आली नाही. परिणामी अनेक शेत हिरवीगार न दिसता कोरडी दिसायला लागली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगाम हातून निघून गेल्याने आर्थिक नियोजन बिघडलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे