फ्रेंडशिप डे' निमित्त पुनर्रोपित 'जीवन' वटवृक्षाचा दहावा वाढदिवस उत्साहात
अकोला, 02 ऑगस्ट (हिं.स.)। फ्रेंडशिप डे चे औचित्य साधत पुनर्रोपित करण्यात आलेल्या जीवन या वटवृक्षाचा दहावा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात पार प
Photo


अकोला, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

फ्रेंडशिप डे चे औचित्य साधत पुनर्रोपित करण्यात आलेल्या जीवन या वटवृक्षाचा दहावा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडला.

दहा वर्षांपूर्वी वादळात उन्मळून पडलेल्या वटवृक्षाचे पुनर्रोपण आदर्श पार्क परिसरात वृक्षमित्र अजय गावंडे यांनी पुढाकार घेऊन केले होते. त्यानंतर या वृक्षाला जीवन असे नाव देण्यात आले. पुनर्रोपणाचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अशा अनेक वटवृक्षांना विविध ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आले. उन्मळून पडलेल्या एका वृक्षाला पुन्हा उभे करून त्याला नवजीवन देण्याचा हा प्रयोग केवळ वृक्ष वाचविण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यातून पर्यावरण संवर्धनाची एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने वृक्षाला मैत्रीचा धागा बांधून, केक कापून आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेऊन दहावा पुनर्रोपित वाढदिवस साजरा करण्यात आला. वृक्षाला राखी किंवा मैत्रीचा धागा बांधण्याच्या या अनोख्या उपक्रमातून माणूस आणि वृक्ष यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी वृक्षसंवर्धन हीच खरी पर्यावरण संरक्षणाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत अशा उपक्रमांचा समाजात विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित सर्वांना यावेळी वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.

यावेळी अजय गावंडे, संजय भांगे, तुलसीदास खिरोडकार, मधुकर गायकवाड, इमरान सिद्दिकी, योगेश थोरात, दिनकर गायकवाड, मयूर जोशी, संतोष राठी, प्रा. सुधाकर चौधरी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

“अकोला शहराचे वाढते तापमान लक्षात घेता वृक्षांची कत्तल थांबवून अधिकाधिक वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. केवळ वृक्ष लावून उपयोग नाही, तर त्यांचे संगोपन करून ते मोठे होईपर्यंत जपले पाहिजेत. ”

— अजय गावंडे, वृक्षमित्र

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande