
बीड, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। आष्टी मतदारसंघाचे आ. सुरेश धस यांच्या संकल्पनेतून वीर डेअरी फार्म पंजाब यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ मर्यादित, आष्टी यांच्या वतीने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'अटल मिल्क पशुखाद्य' उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पशुखाद्याचा वापर करून दूध उत्पादनात वाढ करावी व आर्थिक उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले यांनी केले आहे.
संघामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले हे पशुखाद्य दर्जेदार कच्च्या मालापासून तयार करण्यात आले असून, जनावरांच्या आरोग्यास पोषक ठरणारे आहे. नियमित वापरामुळे प्रतिदिन दूध उत्पादनात वाढ, दुधाची गुणवत्ता सुधारणा, फॅट व एस.एन.एफ.चे प्रमाण वाढणे, तसेच जनावरांची शारीरिक क्षमता व प्रजननक्षमता सुधारण्यास मदत होत असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.
या पशुखाद्यात जनावरांच्या आरोग्यास अपायकारक कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर करण्यात आलेला नसल्याने ते सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. पशुखाद्याचा वापर करताना मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने सुरुवात करावी, त्यामुळे जनावरांना नव्या आह-राराची सवय होऊन अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इच्छुक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या दूध संकलन केंद्राशी किंवा आष्टी तालुका दूध संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधून 'अटल मिल्क पशुखाद्य' उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी 'अटल मिल्क पशुखाद्य'चा लाभ घ्यावा. अधिक दूध उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण दूध निर्मितीसाठी हे पशुखाद्य निश्चितच उपयुक्त ठरेल असे शांतीलाल भोसले, चेअरमन, आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis