पिंपरी चिंचवड- भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची प्रगती; आयुक्तांकडून पाहणी
पिंपरी, 02 ऑगस्ट (हिं.स.)। साडेपाच वर्षांपासून रखडलेल्या भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या कामाला ठेकेदार बदलल्यानंतर वेग आला आहे. सध्या जलवाहिनीचे सुमारे ८० टक्के, तर जॅकवेलचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित
PCMC Comm


पिंपरी, 02 ऑगस्ट (हिं.स.)। साडेपाच वर्षांपासून रखडलेल्या भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या कामाला ठेकेदार बदलल्यानंतर वेग आला आहे. सध्या जलवाहिनीचे सुमारे ८० टक्के, तर जॅकवेलचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहराच्या वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर आणि भामा आसखेड धरणातून १६८ दशलक्ष लिटर, असे एकूण २६८ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियोजन केले आहे.या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर, तसेच तेथून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १८.३० किलोमीटर अंतरावर १,४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

या प्रकल्पाचे काम १५ डिसेंबर २०२० रोजी एका ठेकेदाराला देण्यात आले होते. नियोजनानुसार हे काम १४ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ७० टक्के काम पूर्ण झाल्याने सुमारे तीन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदार बदलण्यात आला. नवीन ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर कामाला वेग आला असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande