पुणे : भोसरी–दिघी मार्गावर मुख्य मलवाहिनी बदलणार; ४ ते ५ दिवस वाहतूक बंद
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)।भोसरी–दिघी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनासमोरील मुख्य मलवाहिनी (ड्रेनेज लाइन) चोकअप झाल्याने दिघी (शिवनगर) परिसरातील अनेक घरांमध्ये मैलापाणी शिरण्याची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी
पुणे : भोसरी–दिघी मार्गावर मुख्य मलवाहिनी बदलणार; ४ ते ५ दिवस वाहतूक बंद


पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)।भोसरी–दिघी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनासमोरील मुख्य मलवाहिनी (ड्रेनेज लाइन) चोकअप झाल्याने दिघी (शिवनगर) परिसरातील अनेक घरांमध्ये मैलापाणी शिरण्याची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयामार्फत मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रधनू सोसायटीसमोरील रस्त्याची खोदाई करून नवीन मलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणावरील भोसरी–दिघी मार्गावरील वाहतूक अंदाजे ४ ते ५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक ४, ५, ६ आणि ७ तसेच भोसरी व दिघी परिसरातील नागरिकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतुकीचे नियोजन करून कामास सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दिघी (शिवनगर) परिसरातील मैलापाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

ई क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांनी नागरिकांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande