
परिस्थितीला ठेकेदार जबाबदार - सुनील केदार
नाशिक , 2 ऑगस्ट (हिं.स.)।
- भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी नाशिकमध्ये उद्भवलेल्या खड्ड्यांच्या परिस्थितीवर ठेकेदारांना जबाबदार धरले आहे. आता या विरोधात भाजपाही मैदानात उतरले असल्याचे एका निवेदनाद्वारे सांगून यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात एक भाजपचा टास्क फोर्स तयार केला आहे. या सर्व परिस्थितीवर महापालिका आयुक्तांनी तातडीने पावला उचलावी असेही म्हटले आहे
भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी निवेदनातून ठेकेदारांच्या दादागिरीवर प्रकाशझोत टाकला आहे. भारतीय जनता पक्षाने नाशिकमधील खड्डे त्वरीत बुजविण्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना सूचना दिल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. आजपर्यंत ५ जणांचा बळी गेला आहे. अनेक नागरिक अपघातांमुळे जखमी झाले आहेत. काही अपंग झाले आहेत. सातपूर येथील एका व्यक्तीचा खड्ड्यात पडुन मृत्यून झाल्याने नाशिक महानगर पालिकेने १० लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. खरे तर या विषयाला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप सुनील केदार यांनी केला आहे.
नाशिक शहराची ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांनी वाट लावली आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झालेले आहेत. त्याचा राग ते नगरसेवक, आमदार आणि भाजपवर काढत आहेत. ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आले आहेत. पण यावर काहीही होणार नाही. नाशिकमध्ये ठेकेदारांनी साखळी तयार केली आहे. त्यामुळे ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी झाली आहे. त्यांची मोनोपॉली तोडणे गरजेचे आहे. या सर्व गंभीर बाबींवर महापालिका आयुक्तांनी लक्ष देणे अत्यं गरजेचे आहे. आगामी कुंभमेळा जर यशस्वी करायचा असेल आणि विकासकामे दर्जेदार करायची असतील तर महापालिका आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन जलदगतीने निर्णय घेऊन कामे केली पाहिजे. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे, असे आवाहन भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी केले आहे.
भाजपचा टास्क फोर्स
भाजपने टास्क फोर्स स्थापन केला आहे. यात आमदार, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, ३१ प्रभागातील पक्षाचे पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना आपापल्या प्रभागातील खड्डे व इतर अत्यावश्यक कामांबाबत सूचना करून कामे करून घ्यायची आहेत. तसेच ९८२३१२६९०४ या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी सूचना कराव्यात. त्यानुसार संबंधित महापालिका आयुक्त, अधिकारी यांच्याकडून कामे करून घेतली जातील. जर संबंधित अधिकारी आणि आयुक्तांनी याची दखल घेतली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असल्याचा इशारा, सुनील केदार यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV