
लातूर, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत अव्वल स्थानी असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६ विशेष पुरस्कार जाहीर झाला असून कारखान्याने गेल्या तीन वर्षात १०० टक्के उसाची तोड केवळ हार्वेस्टरद्वारे होत असून याचे जनक व कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्याकडे जाते.
देशभरात केवळ मांजरा साखर कारखाना 100% हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणारा पहिला कारखाना ठरलेला आहे हा पुरस्कार मिळाल्याने राज्यभरातून मांजरा साखर कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*पुणे येथे पुरस्काराने सन्मानित*
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने 71 व्या वार्षिक परिषद व साखर एक्सपो 2026 इंडिया या कार्यक्रमांमध्ये दिनांक आठ ऑगस्ट 2026 रोजी हॉटेल जे डब्ल्यू मेरीयट पुणे येथे मान्यवराच्या हस्ते या पुरस्काराचे शानदार सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे.
*१०० टक्के उसाची तोड हार्वेस्टरद्वारे देशातील पहिला कारखाना*
साखर उद्योगाकडे मजुरांची कमतरता व ऊसाचे क्षेत्र अधिक झाल्याने मे महिन्यापर्यंत चालू ठेवावे लागत असे कधी ऊस तोड कामगार मध्येच निघून जायचे त्यामुळे कारखान्यास ऊसाचे गाळप उशिरा होऊ लागले त्यानंतर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी जिल्हा बँकेच्या मदतीने ऊस तोडणीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व होतकरू तरुणांना ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर देण्यात आले त्यात तोडणी यशस्वी झाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोड लवकर होऊ लागली त्यानंतर जिल्हा बँकेकडून बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना हार्वेस्टर कर्ज योजना सुरू केली त्यात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतः बँकेकडून कर्ज काढून हार्वेस्टर खरेदी केले त्यातुन बहुतांश हार्वेस्टर साखर कारखान्याला भाड्याने लावली मांजरा साखर कारखान्याची स्वतः ची २५ हार्वेस्टर व कारखान्याने हमीवर दिलेले 55 हार्वेस्टर असे एकूण 80 हार्वेस्टर द्वारे १०० टक्के ऊस तोडणी आत्ताच झालेल्या गाळप हंगाम 2025-26 मध्ये झालेली आहे त्यामुळे मांजरा साखर हा देशात 100% ऊस तोडणी हार्वेस्टर द्वारे होणारा केवळ राज्यातील नाही तर देशातील पहिला साखर कारखाना ठरलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis