
रायगड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील धबधबे, नद्या, तलाव आणि धरण परिसरात प्रवेशबंदीचे आदेश लागू असतानाही पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन सुरूच असल्याचे आणखी एक दुर्दैवी उदाहरण रविवारी कर्जत तालुक्यातील सोनलपाडा येथे घडले. पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील २४ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काही तरुणांचा गट कर्जत तालुक्यातील सोनलपाडा परिसरात फिरण्यासाठी आला होता. नदीवरील बंदाऱ्यावरून एका २४ वर्षीय तरुणाने पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने तरुणाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, पावसाळ्यात वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि दुर्घटनांचा धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी धबधबे, तलाव, धरणे, नदीपात्रे तसेच इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही अनेक पर्यटक हे आदेश धाब्यावर बसवून धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, पोहणे आणि पाण्यात उड्या मारण्याचे प्रकार करत आहेत.
रविवारी घडलेली ही दुर्घटना प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर परिणाम अधोरेखित करणारी ठरली आहे. प्रत्येक वर्षी अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)