
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), परळी वैजनाथ यांनी नागरिकांना रेल्वे रुळ अनधिकृतपणे ओलांडू नये, असे आवाहन केले आहे. विशेषतः मोटारसायकल, स्कूटर किंवा इतर कोणतेही वाहन घेऊन रेल्वे रुळांवरून शॉर्टकटचा वापर करणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे आरपीएफने स्पष्ट केले आहे.
वेळ वाचविण्याच्या उद्देशाने अनेक नागरिक रेल्वे रुळांवरून दुचाकी घेऊन प्रवास करतात. मात्र, वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीचा वेग व अंतराचा अचूक अंदाज न आल्याने क्षणार्धात भीषण अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, असा इशारा रेल्वे सुरक्षा दलाने दिला आहे.
आरपीएफने सांगितले की, रेल्वे रुळ अनधिकृतपणे ओलांडणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी केवळ अधिकृत रेल्वे फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट), रोड ओव्हर ब्रिज (आरओबी), रोड अंडर ब्रिज (आरयूबी) तसेच पादचाऱ्यांसाठी उपलब्ध अधिकृत मार्गांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
काही क्षणांचा वेळ वाचविण्याचा प्रयत्न आयुष्यभराची हानी ठरू शकतो. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा आणि इतरांनाही त्याबाबत जागरूक करा, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), परळी वैजनाथ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis