
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)। नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गेल्या दोन महिन्यांत राज्यभर विशेष मोहीम राबवत ८८ ठिकाणी कारवाई केली. या कारवायांमध्ये ९.५० कोटी रुपयांचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला असून २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ही धडक मोहीम राबविण्यात आली. बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात व्यापक कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली. या मोहिमेत औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्वाधिक ३१ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवायांमध्ये सुमारे ५५ लाख रुपयांची औषध सामग्री जप्त करण्यात आली.
याशिवाय विनापरवाना औषध उत्पादन आणि विक्रीच्या २७ प्रकरणांमध्ये कारवाई करत सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सौंदर्यप्रसाधनांचे चुकीचे ब्रँडिंग केल्याप्रकरणी १० ठिकाणी कारवाई करण्यात आली. एफडीएने स्पष्ट केले की, बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, तसेच औषध व्यवसायात पारदर्शकता आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा धडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु