
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)।मुठा नदीकाठच्या नागरिकांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील विसर्गात टप्प्याटप्प्याने मोठी वाढ करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत खडकवासला धरणातून नदीपात्रात २० हजार ७७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. शनिवारी सायंकाळी हा विसर्ग केवळ ८५६ क्युसेक होता. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या सांडव्यावरील विसर्गातही वाढ करण्यात आल्याने मुठा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार खडकवासला धरणात १.९७ टीएमसी, पानशेतमध्ये १०.६५ टीएमसी आणि वरसगावमध्ये १२.८२ टीएमसी पाणीसाठा असून ही तीनही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. टेमघर धरणात ३.४४ टीएमसी (९२.८४ टक्के) पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. चारही धरणांमध्ये मिळून २८.८८ टीएमसी (९९.०९ टक्के) पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २५.६४ टीएमसी (८७.९७ टक्के) होता.
पाणलोट क्षेत्रातील वाढत्या पावसामुळे खडकवासला धरणातील विसर्ग रात्रीभर टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. शनिवारी सायंकाळी ४ वाजता ८५६ क्युसेक असलेला विसर्ग रात्री १० वाजता २,९९६ क्युसेक, रात्री १२.३० वाजता ५,७८३ क्युसेक, २ वाजता ७,७१२ क्युसेक, ३ वाजता ११,७०४ क्युसेक असा वाढवत अखेर रविवारी सकाळी २०,७७९ क्युसेक करण्यात आला.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदीपात्रात किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु