
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यंदा संकष्टी चतुर्थी सुट्टीच्या दिवशी आल्याने आणि परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे भाविकांची उपस्थिती नेहमीपेक्षा अधिक होती.
चतुर्थीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीसह मंदिर परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.
देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे आणि विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते सकाळी सव्वा सहा वाजता श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी ७, दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती झाली. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे संगीत भजनही झाले.
भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने विशेष नियोजन केले होते. गोळेगाव येथील शकुंतला नामदेव कोकणे, जयश्री राजेंद्र शिंदे तसेच मानकरवाडी येथील अर्चना प्रल्हाद मानकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तर पिंपळगाव सिद्धनाथ येथील सागर सुरेश डोके यांनी नैवेद्यासाठी दोन कॅरेट केळी अर्पण केली.यावेळी देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, कर्मचारी, ग्रामस्थ आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु