

रायगड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पेब किल्ला परिसरातील आनंदवाडी येथे ट्रेकसाठी गेलेल्या एका पर्यटकाच्या पायावर मोठा दगड पडल्याने तो गंभीर अडचणीत सापडला. स्वतःची सुटका करणे शक्य नसल्याने संबंधित पर्यटकाने तातडीने मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. नेरळ पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत पर्यटकाची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन जिनोरस कदम (वय २५, रा. ठाणे) हा पेब किल्ल्यावर ट्रेकसाठी गेला असताना त्याच्या पायावर मोठा दगड पडला. दगडाचे वजन जास्त असल्याने तो स्वतःच्या प्रयत्नाने पायातून काढू शकत नव्हता. त्यामुळे त्याने मदतीसाठी पोलिसांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला.
या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई कनके आणि पोलीस शिपाई महाकाल यांनी तातडीने फणसवाडी येथील स्थानिक नागरिकांची मदत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शिताफीने पर्यटकाच्या पायावरील दगड बाजूला करून त्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्याला आवश्यक ती प्राथमिक मदत देण्यात आली.
नेरळ पोलिसांच्या तत्पर प्रतिसादामुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली असून, पर्यटक व स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या मदतकार्याचे कौतुक केले. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना पर्यटकांनी अधिक काळजी घ्यावी, हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा आणि आवश्यक सुरक्षा साहित्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)