रत्नागिरी : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेचा मालगुंडमध्ये महसूलमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । मालगुंड येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. रत्नागिरी तालुका महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
रत्नागिरी : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेचा मालगुंडमध्ये महसूलमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ


रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । मालगुंड येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी पार पडले.

रत्नागिरी तालुका महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महसूल कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालगुंड येथील जांभळीचा पऱ्या ते उपळट येथील कैलास साळवी यांच्या बागेकडे जाणारा शेत पाणंद रस्ता या योजनेतून विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे सुमारे ७ एकर भातशेतीमध्ये खत, बियाणे आणि शेतीमालाची ने-आण सुलभ होणार आहे. तसेच सुमारे ३० एकर आंबा व काजू बागायती क्षेत्रातील बाग व्यवस्थापन आणि फळांची वाहतूक अधिक सोपी होईल. याशिवाय ७५ ते ८० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पक्का व वादमुक्त रस्ता उपलब्ध होणार आहे.

मालगुंड येथील दुर्गवळीवाडीतील सुमारे ३०० नागरिकांची मुख्य रस्त्याशी जोडणी सुधारेल, तर ४० ते ५० विद्यार्थ्यांना विशेषतः पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे एकूण १७५ ते १८० शेतकरी आणि ४० ते ५० विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या शेत पाणंद रस्त्याच्या कामाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande