उद्याच्या पिढीसाठी प्रभागाप्रभागात संस्कारवर्ग, वाचनालयाची गरज - शिल्पा सुर्वे
रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । प्रभागातील रस्ते, वीज, विकासाची कामे होत राहतील. पण उद्याची पिढी घडविण्यासाठी शहराच्या प्रत्येक प्रभागात संस्कारवर्ग आणि ग्रंथालय होणे गरजेचे आहे. पालिकेच्या ३२ नगरसेवकांना मी याबाबतीत सूचित केले आहे, असे प्रतिपादन नगर
जनसेवा ग्रंथालयाच्या समारंभात बोलताना नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे


रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । प्रभागातील रस्ते, वीज, विकासाची कामे होत राहतील. पण उद्याची पिढी घडविण्यासाठी शहराच्या प्रत्येक प्रभागात संस्कारवर्ग आणि ग्रंथालय होणे गरजेचे आहे. पालिकेच्या ३२ नगरसेवकांना मी याबाबतीत सूचित केले आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी येथे केले.

जनसेवा ग्रंथालयातर्फे रवींद्र पिंगे जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित ललितलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि पुस्तक प्रकाशन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. समारंभाचे अध्यक्षस्थान बालसाहित्यिक मदन हजेरी यांनी भूषविले. जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

सौ. सुर्वे पुढे म्हणाल्या, अलीकडे मुलांचे अवांतर वाचन होत नाही. त्यांचा वाचनाचा ओढा कमी झाला आहे. त्यांना वाचनाची गोडी लावणे ही काळाची गरज आहे. पूर्वी आजी-आजोबा असत. ते गोष्टी सांगत. कुठली पुस्तके वाचावीत हे सुचवत. आता विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये मुले केअरटेकरकडे असतात. मात्र मुले संस्कारक्षम होण्यासाठी पुस्तक हेच प्रभावी माध्यम आहे.

जनसेवा ग्रंथालयाचा वर्गबदल करण्यासाठी जागेची अडचण असल्याचे सचिव श्री. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सांगितले होते. त्याचा संदर्भ घेऊन सौ. सुर्वे म्हणाल्या, रत्नागिरी पालिकेच्या २२ पैकी काही शाळा मुलांची संख्या घटल्याने एकमेकांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या एखाद्या शाळेची ग्रंथालयाला योग्य वाटेल ती इमारत येत्या २-३ महिन्यात जनसेवा ग्रंथालयाला दिली जाईल.

यावेळी अमोल पाल्ये यांनी लिहिलेला गावकी कथासंग्रह आणि डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या परिवर्तन या पुस्तकांचे प्रकाशन झाले. श्री. पाल्ये आणि डॉ. प्रभुदेसाई यांनी आपापल्या पुस्तकांविषयीचे मनोगत व्यक्त केले. परिवर्तन पुस्तकाचा परिचय डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी, तर गावकी कथासंग्रहाचा परिचय देवीदास पाटील यांनी करून दिला. अध्यक्ष मदन हजेरी यांनी रवींद्र पिंगे यांच्या संपर्कात आल्यानंतरचे क्षण, त्यांच्यातील साहित्यिक आणि माणूस म्हणून असलेले त्यांचे वेगळेपण याविषयी विवेचन केले.

यावेळी पारितोषिक वितरण झालेल्या ललितलेखन स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा - महेंद्र डोंगरे, गोरेगाव-मुंबई (मामाचं गाव), सौ. चेतना राजवाडे, सांताक्रूझ, मुंबई (वृक्षवल्ली आम्हां सोयरी), सौ. राधिका आठल्ये, रत्नागिरी (आठवणींचा वटवृक्ष), मंगेश दत्तात्रय बापट, चिपळूण (पानगळीतून उमलणारा चैत्र), मंगल पटवर्धन, रत्नागिरी (प्रत्यक्ष व आभासी), सौ. संध्या साठे, चिपळूण (बुजलेल्या पाऊलखुणा), ज्योती हळगेकर-जाधव, नवी मुंबई (माझी प्रभातफेरी),

वैभव मोहन पाटील, मुंबई (मराठी भाषा).

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande