
बीड, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांची लाल परी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) सेवा गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या विकासाची, सामाजिक एकात्मतेची आणि जनसामान्यांच्या विश्वासाची भक्कम जीवनवाहिनी ठरली आहे. शहरी भागापासून ते दुर्गम ग्रामीण व आदिवासी भागापर्यंत विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि लाखो प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी प्रवाससेवा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य एस.टी. सातत्याने करत आहे. अनेक गावांसाठी एस.टी. ही केवळ वाहतुकीचे साधन नसून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि प्रगतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा आहे. नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, तसेच आष्टी शहराच्या विकासालाही निश्चितच नवी गती मिळेल असा विश्वास आमदार धस यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis