उजनी धरणाच्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती; १०० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा नदीकाठावरील अंबाबाई पटांगण आणि व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील काही घरांमध्ये पाणी श
Wari


सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा नदीकाठावरील अंबाबाई पटांगण आणि व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेतले.

खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे १०० कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

भीमा खोऱ्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजनी धरण शंभर टक्के भरले असून पूरनियंत्रणासाठी धरणातून ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दरम्यान, वीर धरणातून नीरा नदीत सुमारे १४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

सायंकाळी सात वाजेपर्यंत पंढरपुरातील चंद्रभागा नदीतून ७७ हजार ७०० क्युसेक पाणी प्रवाहित होत होते, तर नदीची पाणीपातळी ४४२ मीटर इतकी नोंदविण्यात आली. रात्रीतून पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande