
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर (डीपी प्लान) प्राप्त झालेल्या ५६ हजार ७७१ हरकती व सूचनांवर ३ ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. ही सुनावणी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार असून, सुनावणीच्या कालावधीत नाट्यगृह इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने दिले जाणार नाही.
महापालिकेने सुधारित प्रारूप विकास आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्या. या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने १५ मे २०२६ रोजी मंजुरी दिली होती. हरकत नोंदविलेल्या नागरिकांना सुनावणीची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबत टपालाद्वारे नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. सुनावणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नगररचना विभागाचे अधिकारी, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, कनिष्ठ आरेखक, वरिष्ठ लिपिक तसेच कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु