सायबर गुन्ह्यांविरोधात पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन म्यूल हंट’; १३२ गुन्हे दाखल
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)। सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत १३२
Cyber


पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत १३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबर विभाग आणि नवी दिल्ली येथील इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) यांच्या सहकार्याने नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आर्थिक फसवणुकीची रक्कम तातडीने गोठवून ती परत मिळवून देण्यासाठी ‘एमआरएम’ (मनी रिस्टोरेशन मॉड्यूल) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर प्राप्त झालेल्या २ हजार ३५८ तक्रारींची पडताळणी करण्यात आली असून, फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी संबंधित बँकांशी त्वरित संपर्क साधला जात असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.

याशिवाय ‘ई-झिरो एफआयआर’ पोर्टलवर पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची अडचण न येता तक्रारी त्वरित नोंदवून तपास सुरू करता येतो. जुलै महिन्यात या पोर्टलद्वारे २७ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

सायबर फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहावे, संशयास्पद व्यवहार टाळावेत आणि फसवणूक झाल्यास त्वरित अधिकृत पोर्टल किंवा पोलीसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande