
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
भाडेकरार आणि पोलिस पडताळणी न करता घरे भाड्याने देणाऱ्या घरमालकांवर तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या भाडेकरूंवर पुणे शहर पोलिसांनी विशेष कारवाई सुरू केली आहे. ४१ घरमालक आणि भाडेकरूंवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
शहरात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक भाडेतत्त्वावर किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. काही गुन्ह्यांमध्ये भाडेकरूंचा सहभाग आढळून आल्याने त्यांची माहिती पोलिसांकडे नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालकांनी सिटीझन पोर्टलवर भाडेकरू किंवा पेइंग गेस्टची माहिती ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. तसेच भाडेकरार आणि पोलिस चारित्र्य पडताळणीची माहितीही संबंधित पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु