
ब्राम्हण महासंघातर्फे गुणवंताच्या पाठिवर कौतुकाची थाप
नाशिक, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। ब्राम्हण समाजाच्या सर्वांगींण विकासासाठी पुढील काळात राज्यात प्रत्येक विभागात परशुराम भवन उभारण्यात येईल, त्यादृष्टीने महामंडळाने नियोजन केलेले आहे,अशी घोषणा परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी करत ब्राम्हण समाज हा एकसंघ असून तो कायम संघटित राहण्यासाठी सर्वांनी जबादारीची जाणीव ठेवून समाजकार्यात वाहून घ्यायला हवे, त्याचप्रमाणे नोकरी म्हणजेच सर्वस्व ही मानसिकता बदलून उद्योगाच्या माध्यमातून इतरांसाठी नोकरी देणारे उद्योजक बनले पाहिजे,असेही ते म्हणाले.
ब्राम्हण महासंघातर्फे लक्षिका मंगल कार्यालयात झालेल्या गुणगौरव सोहळ्यात ते कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रेजीनेंस क्लासेसचे संचालक डॉ.नितीन पाठक प्रमुख अतिथी होते, शहराध्यक्ष भगवंत(बाळासाहेब) पाठक,,प्रदेशाध्यक्ष भूषण जुन्नरे,उपाध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी,आरंघ सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धनंजय पाठक,महिला शहराध्यक्ष सौ.सोनाली कुलकर्णी,भाजपा नेते लक्ष्मण सावजी,नगरसेविका दिपाली कुलकर्णी,संध्या कुलकर्णी,नगरसेवक अजिंक्य साने हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या ब्राम्हण महासंघाचे तसेच उपस्थितांचे कौतुक करून कॅप्टन दामले म्हणाले,महायुतीचे ब्राम्हण समाजाच्या सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली, याबद्दल युती सरकारचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे, ब्राम्हण समाज हा चेष्टेचा विषय विषय बनला होता मात्र या निर्णयाने एक वेगळं स्थान प्राप्त झाले आहे. महामंडळाची घटना तयार करणे,कार्यालय उभारण्यासह इतर आव्हाने होती,पण ती लिलया पार पडली आहे, घटना तयार करण्याठी अनेक नामवंत मंडळीचा महत्वपूर्ण सहभाग,मार्गदर्शन लाभला आहे, आज पुण्यात आपले स्वतःचे कार्यालय थाटले आहे.
बॅकांकडून मिळणार कर्ज,व्याज फेडणार महामंडळ
उद्योग,व्यवसाय उभारणीसाठी सर्व बॅक या आपल्या समाजाला कर्जसुविधा उपलब्ध करून देतील तसा आदेश बॅकांना दिला आहे असे नमूद करून ते म्हणाले, वैयक्तीक कर्ज(पंधरा लाखांपर्यत कर्ज मिळेल),वैयक्तीक गटकर्जयोजना(५० लाखांपर्यत कर्ज मिळेल) याद्वारे सर्व कर्जावर व्याज परतावा महामंडळाकडून केला जाईल.सर्व बॅकां कर्ज तातडीने मंजूर करून आपल्या समाजाला सहकार्य करतील असेही त्यांनी सांगितले.
महामंडळ इतरांसमोर आदर्श निर्माण करेल
भगवान परशुरामांच्या नावाने सुरु झालेले हे महामंडळ जबाबदारीची जाणीव ठेवून इतरांसमोर नक्कीच आदर्शवत असे काम उभे करतील, त्यादृष्टीने आमचे सुक्ष्म नियोजन सुरु आहे असे सांगुन कॅप्टन दामले म्हणाले,महामंडळाचा पुढील काळातील वाढता विस्तार लक्षात घेऊन प्रत्येक विभागात परशुराम भवन उभारले जाईल, त्यासाठी सहकार्य केले जाईल, प्रशिक्षण केंद्र,अभ्यासिका,व्रंतबंधासारख्या विधीसाठी उपलब्धता ही सोय तेथे असेल. यावेळी श्री.सावजी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. श्री.भगवंत पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. वेदपठण व शंखनादाने कार्यक्रमाची सुरवात झाली. धनंजय पाठक यांनी आरंभ संस्था स्थापनेमागील संकल्पना विषद केली. सौ.गायत्री कुलकर्णी,आर.जे. ऋचा यांनी सुत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
सर्व क्षेत्र विकासासाठी उत्तम
रेजीनेंस संस्थेचे डॉ.नितीन पाठक यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, डॉक्टर,इंजिनिअर व्हायचंय मग पीसीबी घ्यायलाच हवे असे पुर्वीपासून बिंबवले आहे,पण ते योग्य वाटत नाही. जेईई,निट म्हणजेच सर्वस्व असे बिलकूल नाही. तुमच्याकडे संशोधन क्षेत्र,माहिती तंत्रज्ञानसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहे, यात तुम्ही करिअर निवडणूक सर्वांचा विकास साधू शकता, पद,पैसा,प्रतिष्ठा त्यातून मिळू शकते. इतर सर्वच क्षेत्र आपल्याला खुणावतात,आपण योग्य ती निवड करून विकास साधावा, यावेळी त्यांनी आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मी सर्वोतोपरी मदत करीन,जबाबदारी घेईन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV