
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण, धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय उपक्रमांसह विविध गरजू नागरिकांना मदतीचे कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक गटातील चित्रकला स्पर्धेत विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी माधवी मनोहर डहाळे हिने प्रथम क्रमांक मिळवून ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र पटकाविले. कृष्णाबाई देशमुख विद्यालयाची सेजल अशोक इंगळे हिने द्वितीय क्रमांक मिळवत ३ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, तर सरस्वती विद्यालयाची प्रज्ञा प्रवीण सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळविले. विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी अलिशा गजेंद्र संघई हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
प्राथमिक गटातील रंगभरण स्पर्धेत मिलिंद विद्यालयाची अक्षरा अमोल गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळवून ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळविले. वैष्णवी श्रीकांत वाघमारे हिने द्वितीय क्रमांक मिळवत ३ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, तर मिलिया प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी अलशिफा खमर शेख हिने तृतीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळविले.संस्कार प्राथमिक शाळेचा विद्यार्थी गजानन वैजनाथ गिरी याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पर्धेचे आयोजक भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट चित्रांसाठी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चित्रकला स्पर्धेच्या आयोजनास सहकार्य केल्याबद्दल शिक्षक भानुदास चव्हाण, शिवप्रसाद राजनाळे, व्हावळे, रवींद्र केंद्रे व सोमनाथ गोपणपाळे यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis