
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची सांत्वनपर भेट
नाशिक, 2 ऑगस्ट, (हिं.स.)। नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात ३९ दिवस मृत्यूशी झुंज देऊन प्राण गमावलेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबाची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सांत्वनपर भेट घेतली. शासनाकडून ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करताना शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे पुढील तीन-चार महिन्यांत पूर्ण होतील आणि त्यानंतर ३० ते ४० वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन ३९ दिवस कोमात राहिल्यानंतर निधन झालेल्या दीपाली बेळे यांच्या निवासस्थानी रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांत्वनपर भेट दिली. या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी बेळे कुटुंबाला शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
बेळे यांच्या दुचाकीचा खड्ड्यात तोल जाऊन झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांनी तब्बल ३९ दिवस मृत्यूशी झुंज दिली; मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना अत्यंत वेदनादायी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे महाजन यांनी सांगितले. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून महापालिका आणि प्रशासनावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि विकासकामांची माहिती दिली. शहरात कालपासून युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पावसामुळे काही प्रमाणात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV