मंचरमध्ये शांताबाई शेळके यांचे भव्य स्मारक उभारणार - आमदार दिलीप वळसे पाटील
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.) ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार स्वर्गीय शांताबाई शेळके यांच्या बालपणीच्या आठवणींशी निगडित मंचर येथील ऐतिहासिक वाडा अलीकडील मुसळधार पावसामुळे अंशतः कोसळल्यानंतर, त्या जागेवर शांताबाईंचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणा
मंचरमध्ये शांताबाई शेळके यांचे भव्य स्मारक उभारणार - आमदार दिलीप वळसे पाटील


पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.) ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार स्वर्गीय शांताबाई शेळके यांच्या बालपणीच्या आठवणींशी निगडित मंचर येथील ऐतिहासिक वाडा अलीकडील मुसळधार पावसामुळे अंशतः कोसळल्यानंतर, त्या जागेवर शांताबाईंचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शांताबाई शेळके यांच्या वास्तव्याशी संबंधित या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळला. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना वळसे पाटील म्हणाले की, ही केवळ एका जुन्या वास्तूची पडझड नसून मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेशी जोडलेल्या एका महत्त्वपूर्ण स्मृतीला बसलेला धक्का आहे.

आंबेगावच्या संस्कारभूमीत शांताबाई शेळके यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला आणि याच भूमीने मराठी साहित्याला अनेक अजरामर कविता व गीतांची अमूल्य देणगी दिली, असेही त्यांनी नमूद केले.

यापूर्वी अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षकगृहाला शांताबाई शेळके यांचे नाव देण्यात आले आहे. आता मंचर येथील त्यांच्या ऐतिहासिक वास्तूच्या जागेवर उभारण्यात येणारे स्मारक त्यांच्या साहित्यिक कार्य, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक योगदानाची कायमस्वरूपी साक्ष ठरेल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande