
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या सन २०२५–२६ च्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली. अधिक व्याप्ती (हेवी लोडेड) प्रवर्गात माविम सोलापूर जिल्हा कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र (CMRC), शेटफळ (ता. मोहोळ) या ccची पुणे विभागातील उत्कृष्ट साधन केंद्र म्हणून निवड झाली.
मुंबई येथे ३० व ३१ जुलै रोजी आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान माविमच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा (भा.प.से.) यांनी भूषविले. बैठकीस महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) अशोक फळणीतकर, व्यवस्थापक रूपा मिस्त्री, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राखी मिराशी, व्यवस्थापक गौरी दोंदे यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांच्या सन २०२५–२६ मधील कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये अधिक व्याप्ती प्रवर्गात अमरावती जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला, तर सोलापूरने द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांना संयुक्त तृतीय क्रमांक मिळाला.
याचवेळी, माविम सोलापूर अंतर्गत कार्यरत सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र (CMRC), शेटफळ याची पुणे विभागातील उत्कृष्ट साधन केंद्र म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
पुरस्कारांचे वितरण व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा यांच्या हस्ते झाले. माविम सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हा समन्वय अधिकारी मन्सुर पटेल, विभागीय सल्लागार विलास बच्चे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे तसेच दीपक टेकाळे, परमेश्वर इंगळे आणि राजकुमार पवार यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले.
सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने उपाध्यक्षा संगीता सावंत, व्यवस्थापक नितीन साठे आणि जिल्हा समन्वय अधिकारी मन्सुर पटेल यांनी उत्कृष्ट साधन केंद्राचा पुरस्कार स्वीकारला. राज्यस्तरीय या यशामुळे माविम सोलापूरच्या कार्याची प्रभावी दखल घेतली गेली असून, महिला सक्षमीकरण आणि स्वयं-साहाय्य गटांच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड