
रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी परिसरातील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहताना सार्थक सुहास गुरव (वय १६, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक आज सकाळी मित्रांसोबत कारवांचीवाडी धनावडेवाडी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. मुलांच्या ओरडण्याने स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत सार्थकला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तो मरण पावल्याचे सांगितले.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी