
रायगड, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका धक्कादायक प्रकरणात अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तसेच तिचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ याला संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती झाली असून तिने रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला.
याप्रकरणी आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्या राहत्या घरासमोर तिचे लग्न लावून दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ५(जे)(२), ५(एल), ६, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९ व ११, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(i)(m) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)