रत्नागिरी : शाहीर आबा खेडेकर यांचे निधन
रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । जाखडी, कलगीतुरा आणि नमन या पारंपरिक लोककलांमध्ये आपल्या पहाडी आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर (वय ८५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीक मुरादपूर येथी
शाहीर आबा खेडेकर


रत्नागिरी, 2 ऑगस्ट (हिं.स.) । जाखडी, कलगीतुरा आणि नमन या पारंपरिक लोककलांमध्ये आपल्या पहाडी आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर (वय ८५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीक मुरादपूर येथील राहत्या घरी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आबा खेडेकर यांचे नाव जाखडीच्या क्षेत्रात मोठ्या सन्मानाने घेतले जात होते. नमन ही पारंपरिक लोककला घराघरांत पोहोचविण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. डफावरील गाणी आणि आपल्या भारदस्त, पहाडी आवाजातील सादरीकरण हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेले असतानाही त्यांच्यातील उपजत प्रतिभेने लोककला क्षेत्रात त्यांना वेगळी उंची मिळवून दिली. त्यांनी अनेक पदांची रचना केली आणि ती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात सादर केली. वासुदेव मुंगळे घराण्यातील तुरेवाले शाहीर म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. रत्नागिरी आकाशवाणीवरही त्यांनी अनेक वर्षे डफावरील गाणी सादर केली.

लोककलेबरोबरच सामाजिक प्रबोधनाच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. महाराष्ट्र शासनाच्या साक्षरता व प्रौढ शिक्षण अभियानासह दारूबंदी आणि नशाबंदीच्या उपक्रमांत त्यांनी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आबा खेडेकर यांच्या निधनाने शाहिरी आणि कोकणच्या लोककला क्षेत्रातील एक पहाडी आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व अन्य परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande