
लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायतीने राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या आदिशक्ती अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून, तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आता जिल्हास्तरावरही तृतीय क्रमांक पटकावला आहे.
राज्य शासनाकडून सन २०२५-२६ पासून महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्या सबलीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात येत असून, शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीने यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे कार्य अतिशय उत्कृष्ट सुरू असल्याचे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ग्रामपंचायतीच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तम माने तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सरपंच मच्छिंद्र वाघमारे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल शिरूर ताजबंद गावात व परिसरातून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis