अहमदपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। अहमदपूर शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद आणि सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांना शाळेला जाताना व येताना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून पालक
भटके कुत्रे


लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। अहमदपूर शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद आणि सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांना शाळेला जाताना व येताना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून पालकांमध्ये सतत चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आणि शाळांच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः डेरा टाकला आहे. शहरातील ग्रामदैवत हनुमान मंदिर परिसर, भाजी मंडई आणि मटन मार्केट या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांची संख्या डोळे दिपवणारी असून, या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर प्रशासनाला या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करणे किती गरजेचे आहे, याची प्रचिती येते.

शहरातील मुख्य बाजारपेठा, भाजी मंडई आणि मटन मार्केट परिसरात मांसाचे अवशेष व कचरा खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे लढेच्या लढे जमत असतात. याच मार्गावरून लहान शाळकरी मुले, महिला व नागरिक आवागमन करत असतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांचा पाठलाग करून त्यांना फाडल्याच्या किंवा चावल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाताना नागरिकांना कुत्र्यांच्या भीतीपोटी जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. प्रशासनाला या गोष्टीचे गांभीर्य अद्यापही समजले नसून, अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाही संबंधित नगरपालिका प्रशासन अद्यापही गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही, तोपर्यंत प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे. जर नगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी व पालकांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande