
२० हजारांची लाच स्वीकारताना कारवाई
नाशिक, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
: नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरगाणा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहाथ कारवाई केली. लाचेची रक्कम खासगी इसमामार्फत स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील 48 दिवसांपूर्वी संबंधित उपनिरीक्षकाला पैसे देण्यासाठी तक्रारदार गेले होते परंतु त्या दिवसापासून सातत्याने टाळाटाळ करत अखेर 48 दिवसानंतर उपनिरीक्षकाने लाच स्वीकारलीच
सुरगाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदाराच्या मुलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या पत्नीला आरोपी न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २० जून २०२६ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी करताना पंचांसमक्ष दवंगे यांनी ५० हजार रुपयांच्या मागणीनंतर तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २१, २४ व ३० जून रोजी सापळा राबविण्यात आला; मात्र विविध कारणांमुळे लाचेची रक्कम स्वीकारली गेली नाही. अखेर ३१ जुलै रोजी तक्रारदारास पंचांसह पुन्हा पाठविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दवंगे यांनी तक्रारदारास सुरगाणा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीजवळील आदेश किराणा जनरल स्टोअर्स येथे बोलावून तेथे काम करणाऱ्या इब्राहिम करीम वाणी या खाजगी इसमाकडे २० हजार रुपयांची लाचेची रक्कम देण्यास सांगितले. वाणी याने ती रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे व खाजगी इसम इब्राहिम करीम वाणी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात गणेश निंबाळकर, नितीन नेटारे आणि समीर शेख यांचा सहभाग होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV