
लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भरलेल्या यात्रेत अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. यात्रेतील फिरत्या आकाशपाळण्यात बसलेल्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचे लांब केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्याने तिच्या डोक्यावरील कातडीसह केस उपटले गेले. या भीषण अपघातात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेतील जखमी विद्यार्थिनीचे नाव मानवी गोविंद येलके (वय १५, रा. जवळगा साकोळ) असे असून ती नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मानवीचा वर्गात नेहमी प्रथम क्रमांक येत असल्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी सांगितले.
यात्रेतील आनंद क्षणात शोकांतिकेत
जवळगा साकोळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मोठ्या उत्साहात यात्रा भरली होती. यात्रेत विविध व्यापारी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, मनोरंजनाची साधने आणि लहान-मोठे आकाशपाळणे उभारण्यात आले होते. गावासह परिसरातील हजारो भाविक आणि नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मानवी आपल्या मैत्रिणींसोबत आकाशपाळण्यात बसली होती. पाळणा सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्याने वेग घेतला. याचवेळी वाऱ्यामुळे तिचे लांब केस मागील बाजूस उडाले आणि पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच तिच्या डोक्यावरील कातडीसह केस मुळासकट उपटले गेले.
किंकाळ्यांनी यात्रेत उडाली खळबळ
मानवीच्या वेदनादायी किंकाळ्या ऐकताच यात्रेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी आणि पाळणा चालकांनी तातडीने पाळणा थांबवून जखमी विद्यार्थिनीला बाहेर काढले. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने उपस्थितांनी तिला तातडीने उपचारासाठी हलविले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी तिला लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून तिच्यावर शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
गरीब कुटुंबावर कोसळले मोठे संकट
मानवीचे वडील शेळ्या राखण्याचे काम करतात, तर आई-वडील दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलीचे शिक्षण सुरू असताना या भीषण अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबाची धावपळ सुरू असून गावातील नागरिकही मदतीसाठी पुढे येत आहेत.
गावभर हळहळ; विद्यार्थिनीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना
अभ्यासात हुशार, शांत आणि गुणी म्हणून ओळख असलेल्या मानवीसोबत असा दुर्दैवी अपघात घडल्याने संपूर्ण जवळगा साकोळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि नातेवाईक तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
सुरक्षेकडे दुर्लक्ष किती धोकादायक?
या घटनेनंतर यात्रांमधील मनोरंजनाच्या साधनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आकाशपाळण्यांची नियमित तांत्रिक तपासणी, फिरत्या भागांवर संरक्षक कव्हर, आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच पालकांनी लहान मुलांना आणि विशेषतः लांब केस असलेल्या मुलींना पाळण्यात बसवताना केस व्यवस्थित बांधावेत, सैल कपडे किंवा ओढणी यंत्रात अडकणार नाही याची काळजी घ्यावी. पाळणा चालकांनीही सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळून प्रवाशांना आवश्यक सूचना देणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. यात्रेतील सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रशासनानेही आढावा घेऊन अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी परिसरातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis