
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
लेखक, कवींचे विचार आणि साहित्य समाजाला संवेदनशील बनवते – पंकजा मुंडे
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीतील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित कविसंमेलनाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातील नामवंत कवींनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सामाजिक वास्तव, प्रेम, संघर्ष, विनोद, नातेसंबंध आणि जीवनदर्शन अशा विविध विषयांवरील कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.लेखक. कवींचे विचार आणि साहित्य समाजाला संवेदनशील बनवते असे प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी याप्रसंगी केले.
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पवन मुंडे,अनिष अग्रवाल,प्रितेश तोतला, प्रणव मराठे यांच्या संयोजनातून निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कविसंमेलनाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा साहित्यसोहळा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक समृद्धीचा प्रेरणादायी उत्सव ठरल्याची भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, साहित्य आणि कविता ही समाजाला विचारांची दिशा देणारी मोठी शक्ती आहे. कविता माणसाच्या मनाला स्पर्श करते, संवेदनशीलता जागवते आणि समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा देते. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असून नव्या पिढीला समृद्ध विचारांचा वारसा मिळतो. परळीसारख्या सांस्कृतिक भूमीत अशा कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. सकारात्मक सामाजिक वातावरणासाठी येणाऱ्या काळात असे उपक्रम सुरुच राहतील अशी ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis