
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असून, पूरनियंत्रणासाठी धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणातून ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यापूर्वी सायंकाळी ६ वाजता हा विसर्ग ८१ हजार ६०० क्युसेक इतका होता.
विसर्गात वाढ झाल्यामुळे भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह रविवारी सकाळपर्यंत दीड लाख क्युसेक इतका होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिणामी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पुढील दोन दिवस पाण्याखाली जाण्याचा अंदाज आहे.
सध्या धरणात दौंड परिसरातून ९२ हजार ४६५ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९७.६८ टक्क्यांवर पोहोचला असून, धरणाची सुरक्षितता आणि पूरनियंत्रण लक्षात घेऊन विसर्गाचे नियोजन करण्यात येत असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात भीमा नदीवरील हिळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील बंधारा हा शेवटचा बंधारा आहे. शनिवारी सायंकाळी येथे नदीतील प्रवाह सुमारे ५० हजार क्युसेक होता. मात्र, धरणातून विसर्ग वाढवल्यानंतर रविवारी सकाळपर्यंत तो दीड लाख क्युसेक होण्याचा अंदाज असून, त्यामुळे परिसरातील सर्व बंधारे पाण्याखाली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड