
परभणी, 02 ऑगस्ट (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी मध्यम प्रकल्पात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरण ९६ टक्के भरले आहे. धरणातील पाणीपातळी सुरक्षित मर्यादेत ठेवण्यासाठी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती लघु पाटबंधारे विभाग, परभणी यांनी दिली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीकाठावरील गावांतील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार तसेच नदीकाठावरील परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी (महसूल) जीवराज डापकर यांनी केले आहे.
सध्या मुळी धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ४ टक्के पाण्याची आवश्यकता आहे. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना पत्राद्वारे माहिती दिली असून खबरदारीचे उपाययोजनांचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मुळी धरणाच्या खालील भागातील मुळी, भांबरवाडी, धारखेड, नागठाणा, झोला, मसला, पिंप्री, खरबडा तसेच पालम तालुक्यातील भुजबळ सावंगी, रावराजूर यांसह पालम, पूर्णा, गंगाखेड आणि गोदावरी नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. गोदावरी नदीलगत असलेल्या शेतातील कच्ची व पक्की घरे, शेतातील जनावरे, कृषी अवजारे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच मच्छीमारांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सावध राहावे, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis