
लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
अंधोरी पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे यांनी घेतली सदिच्छा भेट
अंधोरी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अंधोरी पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी सुरू ठेवणे, तसेच अंधोरी परिसरातील अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अंधोरी पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत यापूर्वीही संबंधित पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप या विषयावर कायमस्वरूपी निर्णय झालेला नाही. काही वेळ पोलीस दूरक्षेत्र सुरू ठेवले जाते, त्यानंतर ते पुन्हा बंद करून पोलीस कर्मचारी निघून जातात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अंधोरी गाव व परिसर हा विस्तीर्ण असून आजूबाजूचा भाग डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे एखादा किरकोळ वाद किंवा गुन्हा घडल्यास पोलीस तातडीने उपलब्ध होत नाहीत. परिणामी, किरकोळ घटना गंभीर स्वरूप धारण करतात. अनेक वेळा नागरिकांना ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलीस पाचारण करावे लागतात. तोपर्यंत बराच वेळ निघून जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनते, या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले.
या सर्व बाबी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यांनी यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, अंधोरी पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आणि परिसरातील सुरक्षाविषयक प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी दिले.
अंधोरी परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी कार्यरत राहणे ही काळाची गरज असून, यासाठी पुढील पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis