
मुंबई, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। हरवलेल्या आठवणी, गावाकडच्या संस्कृतीचे जतन आणि भूतकाळातील मुक्कामांना शब्दबद्ध करणाऱ्या 'हरवलेलं मुक्काम पोस्ट' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा समतोल फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला असून साहित्यप्रेमींसाठी ही एक विशेष पर्वणी ठरणार आहे.
लेखक विजय जाधव लिखित या पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्वेली बुक्स प्रकाशित 'हरवलेलं मुक्काम पोस्ट' या पुस्तकातून गावाकडच्या हरवत चाललेल्या आठवणी, माणसांचे भावविश्व आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या मुक्कामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समतोल फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर