लातूर ग्रामीणमधील १४ देवस्थानांना तीर्थक्षेत्र विकासाचा ‘क’ दर्जा
लातूर, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील १४ देवस्थानांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून त्यांना
रमेश आप्पा कराड


लातूर, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील १४ देवस्थानांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून त्यांना ‘क’ दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित देवस्थानांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला असून भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली. यावेळी आमदार रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध देवस्थानांना तीर्थक्षेत्र विकासाचा ‘क’ दर्जा देऊन भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

या मागणीनुसार श्री सच्चिदानंद महाराज देवस्थान, भादा (ता. औसा), श्री खंडोबा मंदिर, भाडगाव, श्री काशीविश्वेश्वर मंदिर, दगडवाडी, श्री महादेव मंदिर, मुशिराबाद, श्री बाळूमामा देवस्थान, ममदापूर, श्री जगदंबा मंदिर, सलगरा बु., बाराइमामा देवस्थान, उमरगा, श्री हनुमान मंदिर, भातांगळी, श्री जगदंबा मंदिर, बामणी, श्री खंडोबा मंदिर, सलगरा खु., श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रमजानपूर, श्री हनुमान मंदिर, काटगाव, श्री संत माधव मामा ज्ञानेश्वरी संस्थान मठ, पानगाव (ता. रेणापूर) आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान, जवळा बु. या १४ देवस्थानांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत देवस्थान परिसरात भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व विविध विकासकामे करण्याचा मार्ग खुला होणार आहे. या निर्णयाबद्दल संबंधित गावांतील भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आमदार रमेशआप्पा कराड यांचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande