ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आलं आहे. १५ ऑगस्टची मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने २० ऑगस्टपासून प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अकोला शहरासह
ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य


अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आलं आहे. १५ ऑगस्टची मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने २० ऑगस्टपासून प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अकोला शहरासह तालुकास्तरावरही आरटीओच्या भरारी पथकांकडून चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी केली जात आहे. मराठी येत नसलेल्या चालकांना सुरुवातीला एक महिन्याची मुदत दिली जाणार असून, त्यानंतरही मराठी न शिकल्यास पीएसव्ही बॅजवर निलंबनाची कारवाई होणार आहे.

ऑटो असो किंवा टॅक्सी... प्रवाशांशी संवाद साधताना आता चालकांना मराठीचं प्राथमिक ज्ञान असणं बंधनकारक असणार आहे.

मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी चालकांना यापूर्वी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने २० ऑगस्टपासून राज्यभरात तपासणी मोहीम सुरू केली आहे.

अकोला महानगर परिसरासह तालुकास्तरावर आरटीओच्या भरारी पथकांकडून ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी केली जात आहे.

प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेली मराठी भाषा चालकाला बोलता आणि समजता येते का, याची पडताळणी केली जात आहे.

ज्या चालकांना दैनंदिन व्यवहारातील मराठी बोलता किंवा समजता येत नाही, अशा चालकांना थेट कारवाई न करता प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे.

या कालावधीत चालकांना मराठी भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, एक महिन्याची मुदत संपल्यानंतरही मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्यास संबंधित चालकाचा पीएसव्ही बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे.

विशेष म्हणजे, परिवहन विभागाच्या आदेशाची उघडपणे अवहेलना किंवा वारंवार टाळाटाळ केल्यास अधिक कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

भाषेचा अडथळा दूर करून प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा, सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेचा वापर वाढावा, हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

त्यामुळे अकोला शहर आणि जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आता मराठी शिकणं हा पर्याय नसून, सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत कार्यरत राहण्यासाठी आवश्यक अट ठरणार आहे.

ऑटो किंवा टॅक्सीमधून प्रवास करताना चालकाला प्रवाशाचं म्हणणं समजणं आणि प्रवाशालाही चालकासोबत सहज संवाद साधता येणं महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने मराठीच्या व्यावहारिक ज्ञानाची तपासणी सुरू केली आहे.

प्रथम संधी त्यानंतर निलंबनाची कारवाई आणि आदेशाची अवहेलना केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा. त्यामुळे आता अकोल्यातील ऑटो-टॅक्सी चालक मराठीच्या या परीक्षेत किती लवकर पास होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande