
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
शाळेत शिक्षणाचे धडे गिरवायला येणाऱ्या निष्पाप चिमुरड्यांकडून शाळेच्या वेळेत कष्टाची कामे करून घेण्याचा एक संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. अकोला जिल्हा परिषद शाळा, राजंदा येथील मुख्याध्यापक कैलास वसंतराव केदार यांनी शाळकरी मुलांकडून स्वतःच्या घरची लाकडे वाहून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अमानुष प्रकाराविरोधात आज सामाजिक कार्यकर्ते मयूर काळे यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयासमोर 'डफळे वाजवा' आंदोलन केले. मुख्याध्यापक कैलास केदार यांनी स्वतःच्या घरासमोर तोडलेले लाकूड शाळेतील लहान मुलांना वाहून नेण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी शाळेत राष्ट्रगीत आणि परिपाठ चालतो, त्याच पवित्र वेळेत या गरीब आणि लहान मुलांकडून ही कष्टाची कामे करून घेतली जात होती. हा संपूर्ण प्रकार सामाजिक कार्यकर्ते मयूर काळे यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मराठी शाळेत शिकायला येणाऱ्या गरीब मुलांचा छळ थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर मयूर काळे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. मुलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषी मुख्याध्यापकावर तात्काळ आणि कडक प्रशासकीय कारवाई व्हावी, या मागणीसाठी आज शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर डफळे वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. जर प्रशासनाने तातडीने निलंबनाची कारवाई केली नाही, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा मयूर काळे यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे