अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे खरिपाची पिके पूर्णपणे संकटात सापडली आहेत. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांना पाण्याचा तीव्र ताण बसत
अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी


अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे खरिपाची पिके पूर्णपणे संकटात सापडली आहेत. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांना पाण्याचा तीव्र ताण बसत असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन अकोला जिल्ह्यात तात्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अकोला जिल्हाधिकारी मार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहे. मात्र, जमिनीतील ओलावा संपल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फुलगळ होत असून शेंगांमध्ये दाणे न भरण्याची भीती निर्माण झाली आहे. अशीच बिकट अवस्था कापूस, तूर व इतर पिकांचीही झाली आहे.अकोला जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ घोषित करण्यात यावा.

गावनिहाय व शेतनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.

वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख नुकसान भरपाई द्यावी. सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा पूर्ण व न्याय्य लाभ मिळवून द्यावा. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा दिलासा मिळावा. ग्रामीण भागात जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तातडीने सोय करावी. शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी मागणीची त्वरित दखल न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande