
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
अकोल्याच्या मूर्तीजापूर तालुक्यातील विराहित परिसर आणि अन्य भागातील सोयाबीन पीक सध्या अत्यंत गंभीर परिस्थितीत असून, पूर्णतः दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. महिनाभरापासून एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ पूर्णपणे खुंटत चालली आहे. पाण्याचा तीव्र टंचाईमुळे शेतातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, उभ्या पिकाला जगवणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. या अत्यंत संवेदनशील काळात पिकाला पाण्याची सर्वाधिक गरज असते. मात्र, ऐन वेळेवर निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे फुलोरा कोमेजू लागला आहे. वेळेत पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचे चित्र आहे. हवामानाच्या या लहरीपणामुळे शेतकरी डोळ्यात तेल घालून पावसाची वाट पाहत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत जर जोरदार पाऊस आला नाही, तर हातात आलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपून जाण्याची भीती वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे