
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावती शहरात गेल्या बारा वर्षांपासून भव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासोबतच छायाचित्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात सातत्याने बारा वर्षे कॅमेरा दिंडीचे आयोजन करणारा अमरावती हा एकमेव जिल्हा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अमरावतीच्या या अनोख्या उपक्रमाची प्रेरणा घेत गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अन्य तीन ते चार जिल्ह्यांमध्येही जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडीचे आयोजन सुरू झाले आहे. त्यामुळे अमरावतीच्या या उपक्रमाने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.कॅमेरा दिंडीमध्ये शहरातील छायाचित्रकार, पत्रकार, छायाचित्रण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. छायाचित्रण ही केवळ कला नसून समाजातील महत्त्वाच्या घटना, परंपरा, संस्कृती आणि इतिहास जतन करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.या उपक्रमाला शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, नगरसेवक मिलिंद बांबल, नगरसेवक ऋषिकेश देशमुख, शिवसेना जिल्हाध्यक्ष आशिष धर्माळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, तसेच गजानन महाराज संस्थान, विवेकानंद कॉलनी, अमरावतीचे अध्यक्ष अजय जगताप यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.बारा वर्षांची परंपरा कायम ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या कॅमेरा दिंडीमुळे अमरावतीच्या छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी